आमचे सर
सदर लेख 2021 मधील आहे.. प्रिय मिलिंद काकांस , काल दुपारी १ च्या सुमारास फोन वाजला , आणि कळलं टिकेकर सर गेले. मन सुन्न ,उद्विग्न झालं. ऐकलेली बातमी खोटी ठरावी असं मनोमन वाटून गेलं. पण दुर्दैवाने अशा बातम्या खऱ्या असतात. आणि पहिल्यांदा जाणीव झाली , आपले टिकेकर सर गेले. तुला मी पहिल्यांदा दुसरीत असताना भेटलो असें , तुझ्या आईकडे मी शिकवणीसाठी यायचो. सकाळी ८ वाजता असायची साधारण. तू बरेचदा झोपेतून उठत असायचास. आज पण मला बाईंची ती घर सांभाळत शिकवणी घ्यायची लगबग आठवते. तू त्यावेळी बी.एड च्या शेवटच्या वर्षाला असावास बहुतेक. ७-८ मुलांचा छोटासा वर्ग तो.. तिथे आम्ही खूप शिकलो - आणि त्यात पण तुझे आमच्याकडे असलेलं बारीक लक्ष आठवते. कोण विद्यार्थी किती पाण्यात आहे , कोण लक्ष देतंय किंवा टिवल्या -बावल्या करताय यावर विशेष टिकेकर style टिप्पणी यायची. आम्हाला मिलिंद काकाचे अप्रूप होते.. त्याच वेळी कबड्डी खेळताना तुझा समोरचा दात तुटला होता.. पण तुझ्यामध्ये अजिबात फरक पडला नव्हता .. त्याचे काय एवढे.. खेळताना होयचंच असं , असा साधा सरळ हिशोब. आज जाणवत की हा साधा सरळ हिशोब मांडणं फार अवघड असतं , पण ते तु...