कालाय तस्मै नम: !

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच  एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार .  मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी  रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी  बरयाच सोयी-सुविधा  मोफत  दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे  पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट  देण्यात आली .  ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता.    एकूणच सगळं  ऐटीत  चालल होतं . शहरातले  लोक सुजाण , सुशिक्षित   आणि कामसू होते.  त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या   आपल्या  संस्थेत  जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली  वागणूक मिळत असे. वातानुकुलीत दालने,  हवा तेंव्हा  आणि पाहिजे  तेंव्हा    चहा- कॉफी , सकाळ - संध्याकाळचा नाष्टा ,दुपारचे जेवण एकदम  वाजवी दारात असा शाही  थाट  होता. कामाचाही फार जास्त दबाव  नसे, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ कधीतरी ७ , शनिवार , रविवार सुट्टी  असे चालले होते.  कामही संगणकावर असल्याने शारीरिक श्रमाचा प्रश्न नव्हता.

दुसरीकडे  नगरीचा विकास जोमाने होत होता . अनेक नवीन गृहप्रकल्प येथे चालू झाले . पूर्वी जी शेतजमीन होती , तिथे आता टोलेजंग इमारती दिमाखात उभ्या राहत होत्या. सर्व नागरीकांनी आपल्या संस्थेच्या जवळच गृहप्रकल्पात  घर खरेदी केले .  जसजसे मानधन व मागणी वाढू लागली तसतसे घरांचे भाव वाढू लागले ,  गगनालाच भिडले म्हणा ना. परंतु नागरिक घर घेण्यास उत्सुक होते, त्यामुळे  हे नैस्रार्गिक चालले आहे असे सगळ्यांचे मत होते. घराबरोबरच इतर सर्व वस्तूंचा बाजारही खुलत  होता. फर्निचर, खाण्या पिण्याची ठिकाणं, फळे- भाजीपाल किराणा केंद्र  , चित्रपटगृहे ,नवनवीन  वाहने   यांनी  बाजारपेठ   सजत होती.  नागरिक दर्जा ला जास्त महत्व देत होते , पैसे थोडे कमी-जास्त चालतात असा कल होता.  या नगरीत महागाई वाढल्याने  जुने जाणते लोक थोडेसे अस्वस्थ होते, त्याना हे सर्व नवीन होते. परंतु नवनागरीकांना  हे सर्व होणारच हे माहित होते. "अरे आपली मिळकत ही वाढली की" असे  ते म्हणत . सगळं  कसं  यंत्रवत चालला होतं .

संस्थेतील दिवाण व कारभारी नागरिकांच्या कामावर खूष  होते , एखादा नागरिक जर फारच चांगले काम करत असेल तर त्याला दूर देशात पाठवायची योजना केली जात असे. ही संधी प्रत्येकाला हवी हवीशी वाटे. त्यामुळे सगळे जण जोमाने काम करीत असत.  सर्व काही  आलबेल होते.   अर्थात थोडे बहुत खाच खळगे होतेच.  आता कधीमधी शनिवारी काम करावे लागे.  एखाद दिवस घरी यायला उशीर होई .  पण हे होण्याचे प्रमाण कमी होते  आणि याचा मोबदला बोनस रूपात मिळतही असे, त्यामुळे नाराजीचा स्वर नव्हता. नागरिक  संस्थेतील वेळेव्यतिरिक्त  खूप मजा करीत असत . शनिवार रविवारी बाहेरगावी जाउन निसर्गाच्या सान्निध्यात जात  किंवा एखादा नवीन चित्रपट बघत असत. बाजारात  अनेक गोष्टींची  खरेदी केली जाई .  खेळांच्या स्पर्धेत भाग घेत. विविध पदार्थ , पेयपान यांचा  आस्वाद घेणे चालूच  होते. आता जुनाट विचारातून बाहेर पडल्याने  पेयपान  ई .  गोष्टींकडे कोणी हेटाळणीच्या  द्रुष्टीने  बघत नसे .   नवीन नजर आणि अंदाज असलेली आयटीपार्क नगरी स्वप्नवत असल्याचा  सर्व नागरिकांचा विश्वास होता. हे सर्व थोडे जास्तच चांगले चालले होते आणि ते असेच चालू राहील असे सगळ्यांना वाटे, काहीही शाश्वत नसते हे माहित असताना देखिल. जो कोणी थोडासा निंदा करत असे त्याला  जुनाट ठरवून नागरिक पुढे जात.

अचानक एका वर्षी दूर देशामध्ये अर्थव्यवस्था ढेपाळली , तेथील  मोठ्या मोठ्या संस्था डबघाईला आल्या. याच देशात प्रामुख्याने  नगरीतली माल जात असल्याने इकडच्या संस्थावर परिणाम होणे अपरिहार्य होते. राजाने आश्वासन दिले की - आपली नागरी इतर ठिकाणी माल पाठवू शकते तसेच आपण  धोरणात्मक दृष्ट्या सुरक्षित आहोत.  परंतु संस्थेतील दिवाण  या परिणामासाठी तयार नव्हते.  नवीन काम येण्याचे बंद झाले .  काही काही ठिकाणी तर जुने आणि नियमित असे कामही बंद करावे लागले.  परिस्थिती वाटते तेवढी सोप्पी नाही हे हळू हळू सर्वांच्या लक्षात आले. उच्चस्तरीय बैठकी चालू   झाल्या , अहवाल मागवण्यात आले, मार्ग काढण्यासाठी खल चालू झाले . अनेक बैठकीनंतर दिशा ठरवण्यात आली  की आपल्याला जर का स्पर्धेत राहायचे असेल  तर मेहनत जास्त करावी लागेल आणि थोडा खर्च  ही कमी करावा लागेल. यात नागरिकांचा विचार तसा कमी होता पण हे सर्व केवळ थोड्या काळासाठी असल्याने नागरिकांचा सहभाग अपेक्षित होता.

आता कारभारी लोकांवर ही नवीन प्रणाली राबवायचा भार आला होता.  त्यानुसार त्यांनी कमी  किंमतीत व  कमी वेळात  कामे  स्वीकारली , तसा वायदाच केला.  आता नागरिकांच्या घरी यायच्या वेळा अनिश्चित  होऊ लागल्या.  शनिवार रविवारचे काम नियमित होऊ लागले. रात्री अपरात्री बैठका  होऊ लागल्या.  नागरिकांच्या झोपेच्या , खायच्या प्यायच्या सवयी बदलू  लागल्या .त्यातून दूर देशी पाठवायचे प्रमाणही कमी झाले.
आता नागरिक बेचैन होऊ लागले होते. त्यांना पैसे मिळत होते , पण मिळणाऱ्या पैशाचा उपभोग घ्यायला वेळ मात्र मिळत नव्हता. पूर्वी एखाद दिवस काम जास्त केले तर लक्षात राहायचे, आता एखाद दिवशी संस्थेतून लवकर सुटलो तर लक्षात रहाते असे नागरिक म्हणू लागले. अशीच काही वर्षे गेली . थोड्या काळासाठी ही परिस्थिती असेल ही समजूत भ्रामक ठरली . कारभारी लोकांना एक कळले होते की नागरिकांना  पिळले की ते पिळले जातात, आणि थोडे त्रस्त होऊन का होईना काम होते, ते सुद्धा कमी वेळात आणि पर्यायाने कमी पैशात. संस्थेच्या कार्यकारी मंडळापर्यंत याचे अहवाल पाठवले गेले.  'जैसे थे ' साठी वरून हिरवा कंदील   मिळाला . बाहेरच्या देशात देखील आपल्या सारखी  नगरे चालू झाली आहेत , तेथे लोक कमी कमी पैशात कामे करू लागली आहेत , त्यामुळे आपल्याला बदलले पाहिजे, मागण्या  कमी केल्या पाहिजेत असे नागरिकांना सांगण्यात आले.

नागरिकांच्या भ्रमाचा भोपळा आता पुरता फुटला होता.  नागरिकांना  आता प्रश्न पडू लागला  , आपण ज्याचे स्वप्न बघितले होते ती नगरी  हीच का , जिथे आपल्याला हवे ते करायला वेळ मिळत नाही . घरात असून सुद्धा आपण सदैव संस्थेच्या विचारात दंग असतो , घरात नसतोच  म्हणा ना ? सर्व ठिकाणी चर्चांमध्ये  हाच विषय येऊ लागला . या बेचैनिचा स्फोट कधीतरी होणारच होता. त्याप्रमाणे एक दिवस नागरिकांनी बेमुदत संपाची घोषणा केली . बाकी सगळे जण  संप करू शकतात मग आपण का नाही असे ते म्हणाले . आम्हाला वेळ मिळाला पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती . सर्व संस्थांनी मिळून नागरिकांना निक्षून सांगितले की  तुम्ही संप करू शकत नाही . आपल्या कायद्यात ते बसत नाही .  पण  नागरिक बधले नाही आता 'आर या पार' अशी त्यांची भूमिका होति. राजानेही संस्थाना काही सांगितले नाही , उलट नागरिकांनाच चार समजुतीच्या गोष्टी  सांगितल्या . तुम्ही परत संस्थेत या, तुमच्या मागण्यांचा मागून विचार करता येईल असे थातूर मातुर उत्तर नागरिकांना मिळाले, पण ते हटले नाहीत. परत उच्चस्तरीय बैठका चालू  झाल्या .  त्यात निर्णय असा झाला  की  नागरिकांची वेळेबद्दलची  मागणी अवास्तव आहे, याप्रमाणे आपल्याला काम करता येणार नाही . आपण  काम केलेच तर ते फायद्यात रहाणार नाही , सबब नागरिक ऐकत नसतील तर आपण संस्थेचे सर्व विकून संस्था दुसऱ्या  देशी हलवू, जेथील नागरिक काम करण्यास तयार आहेत.  सर्वाना हा निर्णय कळवला गेला . नागरिकांचा यावर विश्वास बसला नाही , त्यांनी संप चालू ठेवला. त्यांच्या पुढार्यांनी  'काम पणआणि  वेळ पण' च्या घोषणा दिल्या.  जुन्या जाणत्या  लोकांना गिरण कामगारांच्या संपाची आठवण आली . त्यांनी तसे नागरिकांना सांगितले देखील  पण नागरिक थोडसे मग्रुरीने  म्हणाले , " काय समजत काय तुम्ही गिरण कामगारात  आणि आमच्यात काही फरक आहे की नाही ?"

संप चालू राहिला , शेवटी ज्याची भीती होती तेच झाले , संस्थांनी सर्व काही विकून आपला गाशा गुंडाळला .
नागरिकांचे काम सुटले ,इतके दिवस ऐशोआरामात काढल्यावर , संगणकासमोर काढल्यावर इतर काही करणे त्यांच्यासाठी जड होते. आता वाढलेली महागाई त्यांना टोचू लागली.  बाजारहाट कमी झाला , नवीन गृहप्रकल्प बंद झाले. पूर्वी मोठ्या माणसांनी  सांगितलेल्या अकलेच्या गोष्टींचे महत्व नागरिकांना आत्ता कळत  होते. परंतु वेळ निघून गेला होता, स्वप्ने कायम रहात नाहीत हे नागरिकांना कळले होते. काही नागरिक  नगरी सोडून आपल्या आपल्या  गावी परत गेले. . वेळेची मुख्य  मागणी होती नागरिकांची , आता त्यांच्याकडे तो भरपूर होता पण आता तो वेळ वापरायला साधने उरली नव्हती ,आयटीपार्कला अवकळा आली होती.  काय म्हणणार याला ,  कालाय तस्मै नम:! दुसरे  काय?




Comments

rajesh bhide said…
..keval Apratim , Sameer ! :)
sanjay deshmukh said…
Wow... Sameer...budding chetan bhagat
sanjay deshmukh said…
Wow... Sameer...budding chetan bhagat
sanjay deshmukh said…
Wow... Sameer...budding chetan bhagat

Popular posts from this blog

RaajGad - A Trek part 1

Few questions after a win in Lost series...

Sometimes..