नाटेकर

नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित  करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे  आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी
च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले. ते स्वतः खटले चालवतात. पण नाटेकरांची खरी ओळख मला यामुळे नाही झाली , तसंही कोर्टकचेरीतलं अजुनही विशेष कळत नाही , त्यावेळी तर बिलकुलचं नाही. आमचही गाव केळ्ये , तिथे त्रिपूरी पौर्णिमेचा ऊत्सव मोठ्या जोरात साजरा होतो , दिवाळीच्या  दरम्यान जी काकडे आरत चालू होते ती त्रिपूरीला संपते, आणि मग त्यादिवशी गावजेवण असे. असाच पहिल्या पंक्तीला बसला असताना, नाटेकर समोर बसले होते,आणि जिलबीचं ताट वाढायला आलं , आग्रह वगेरेच्या भानगडीत न पडता , ते पूर्ण ताट तिथे रिकामं झालं . नाटेकरांची ब-याच जणांना ओळख  ह्याचीच होती , खाण्याच्या बाबतीत केळ्ये पंचक्रोशीत त्यांची ख्याती
होती.त्यांच पान नेहमी पंगतीच्या कडेला घेतलं जात असे , कारण एका पंक्तीला जो  साधारण वेळ लागतो , तो त्यांच्या 'सावकाश ' भोजनाला फार कमी होता , किमान  दोन पंगतीना ते सहज साथ देत असंत.

साधारण सहा फूट उंची , दाढी वाढलेली ,अंगात एखादा जुनाटसा शर्ट  कमरेला लुंगी, हातात ५-६ पिशव्या ज्यात त्यांची कोर्टाची असंख्य कागदपत्रे ,असा एकूण आवेश असे,चेहरा मात्र तरुणपणी देखणा म्हणावा असा होता. नाटेकर आमच्याकडे कसे  आले ते आठवत नाही , वडिलांचा स्वभाव तसा भिडस्त , ते कोणाला कधी नाही म्हणाले नाहित,आणि नाटेकर येत राहिले. ते आल्याची वर्दी लगेच आत आईला द्यावी लागत असे, ते जेवायला थांबणार असले तर त्याकाळात  देखील स्वयंपाकाचा परत आढावा घ्यावा लागत असे. पण जेवणात त्यांची खोडी नसे मात्र भरपूर असावे हा एकाच निकष , मग नुसता दही भात असो की किंवा मसाले भात  , एकाच गोडीने तो खाल्ला जाई . ते चहा मात्र पीत नसत, त्यामुळे नाटेकर आले कॉफी  हमखास बनत असे. 

 नाटेकर यायचे ते कोणती तरी  बातमी घेऊन -'आज अभ्यंकराकडे गेलो होतो शिरगावातल्या , तिथे ऐकले की  सुमन  काकूंची  तब्बेत जरा  बिघडली आहे ' , असे त्यांचे बोलणे चालू होत असे. त्यांना  बोलायची फार आवड होती .विषय कोणताही असो ते आपले मत मांडत असत. संपूर्ण पंचक्रोशीतली गावांची त्यांना माहिती होती ,तिथल्या सगळ्या घडामोडी ठाऊक होत्या  त्यामुळे गप्पांना कमी नव्हती ,त्यातून नाटेकर म्हणजे नात्यात रमणारा माणूस. त्यांची नाती लक्षात ठेवण्याची लकब  अजब होती . "काल खेरांकडे  गेलो होतो, माधव खेर म्हणजे  माझ्या आईच्या चुलत  मावशीचा मोठा मुलगा" . असे ते  बोलले  की मी ते नाते जोडायला चालू होत असे.  स्कॉलाराशिपच्या परीक्षेला याचा  चांगला फायदा  झाला .  त्यांना सर्वच नाती जवळची वाटत असत . आणि  ओळखीच्या गावातला माणूस  म्हणजे नात्यातलाच माणुस असेच ते मानत असत. गावतील  अनेक माणसांचा तोंडी परिचय मला नाटेकरांमुळे झाला . कोणत्याही घरातील जुनी मंडळी नाटेकरांसाठी माहितीचा स्त्रोत होती . "हा बेबी ताई  लग्न होऊन सातारयला  गेल्या , शिरीष आणि 
माधव म्हणजे त्याची मुले ना, त्यापैकी शिरीष डॉक्टर  झाला  आणि माधव शेतकी खात्यात आहे मिरजेला  बरोबर ना   ? " वगेरे प्रश्न सर्रास विचारले जात . असे करता करता त्याच्या नात्यांचा विश्वकोश तयार झाला होता. खूप वर्षांच्या अशा तपस्येने ते कोठेही परके वाटत नसत, कारण आपल्या घरातील व्यक्तीबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांना असे. त्यांनी लग्न केले नाही पण अशी अनेक माणसे त्यांनी आपल्या वाक्चातुर्यावर जोडली . जसा जसा त्यात मोठा झालो तसे थोडे कळायला लागले की नाटेकर जी नाते सांगत त्यात नाते गौण असे, महत्व जे नाते आहे ते जपण्याला आणि वाढवण्याला असे. 


चरितार्थासाठी त्यांनी काय केले हा खर तर मोठा गहन प्रश्न आहे. काही थोडे बहुत कोर्ट केसेस मध्ये ते सल्ला देत असत. पायाला भिंगरी ही  लागलेलीच होती . आज रत्नागिरी मध्ये केस  उद्या मुंबई मध्ये ,  मग ४ दिवसांनी काय पुणे असे चालू असे. परंतु वकिलीची डिग्री नसल्याने त्यातून त्यांना उत्पन्न तटपुंजेच असावे. पुढे पुढे जसे त्यांना जाणणारे लोक कमी होत गेले तसे तसे त्यांचे आयुष्य थोडे हलाखीचे झाल्यासारखे वाटले.  वयोमानपरत्वे  प्रकृती साथ देत नसल्याने  भटकंतीवर निर्बंध आले.  साधारणपणे आता कुठे कोणाच्या घरी रहात नाहित.  हल्ली ऐकायला देखील कमी येते , त्यामुळे त्यांचे महत्वाचे अंग ,गप्पा मारणे हे देखील कमी झाले आहे. त्यातून लोकांना  वेळ नसतो. कॉफीवर नाटेकरांना कटवले जाते .  एकूणच  हल्ली नात्यात रमणारे  नाटेकर   एकटे पडलेले दिसतात.  
जे लोक काळाच्या पुढचा विचार  मांडतात त्यांना आपण लोकोत्तर म्हणतो , काळाच्या एक पाउल पुढे आहेत असे म्हणतो. पण काही व्यक्तीच  मुळी  थोड्या   उशीरा  जन्माला येतात. नाटेकर ही असेच  मागल्या शतकाच्या सुरुवातीला  अत्यंत शोभून दिसले असते. ताटभर जिलेब्या खाणारे , गावोगावी उत्सवास जाणारे, नात्याताली माणुसकी जपणारे . सध्याच्या फास्ट  जगात मात्र त्यांना कमीच जागा दिसते. 





Comments

Kaps said…
Sundar...

Mast post ahe.
Natekar bhaltech awadle.

Pratyek gavat ase ek tari Natekar astatch.

Thodkyat pan mast ashi hi vyaktirekha khup awadli...

Krupa karun ajun posts yeudet..

mastaa.. khup chann lihile aahes

Popular posts from this blog

RaajGad - A Trek part 1

Few questions after a win in Lost series...

Sometimes..