हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !


हल्ली बरेचदा असे  जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ  लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ  घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत  जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं  हळवं  होतं आणि आठवणीत रमतं .  उदा. शाईचे पेन.  स्मार्टफोन / Tab / Laptop  च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं  नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते .  पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन  उचललेल्या  किंवा रिफील न होणाऱ्या  पेनात काही आपलेपणा वाटतं  नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता.

माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली . बालवाडीत असताना शिसपेन्सिल वापरल्याचे सुद्धा आठवत  नाही . तेव्हा एरवी लिहायला आणि भूक लागली तर खायला अशी  पांढरी पेन्सिलच वापरली जायची .  परीक्षा वगैरे सुद्धा ( जी नावालाच होती ) ती पाटीवरच असायची .  पहिलीत गेल्यावर शिसपेन्सिल हातात आल्याचे आठवते . जसे लहानपणाचे दिवस फार काळ  आठवणीत टिकत नाहीत त्याप्रमाणे  लिहिलेले खोडायला बरी म्हणून  शिसपेन्सिल वापरत असावेत  (नाहीतर मुले सुद्धा ब्लॉग /आठवणी लिहायला लागायची ) .
वरच्या वर्गातील मुले पेन वापरायची , तेव्हा त्यांचे प्रचंड अप्रूप वाटायचे व आपण कधी एकदा मोठे होणार आणि पेन वापरायला लागणार असा प्रश्न पडायचा . मोठे झाल्यावर जे अनेक फायदे असतात त्यातला पेन वापरता येणे हा एक  मुख्य घटक होता . चौथीच्या स्कॉलरशिपला पेन वापरल्याचे आठवते  बाकी संपूर्ण प्राथमिक शाळा  पेन्सील , शार्पेनर , खोडरबरामधे गेली.  नंतर यथावकाश पाचवीमध्ये पेन हाती आले आणि प्राथमिक संपून आता माध्यमिक मध्ये आलो याची खरी जाणीव झाली . पहिले पेन रेनॉल्डचे असावे. पेन दिसायला साधे होते.  परंतु स्थित्यंतराचा भाग म्हणून अजूनही लक्षात  आहे.आपण जे लिहिले आहे किंवा गणित सोडवले आहे ते पहिल्यांदाच पक्के असायला हवे  हे पेन वापरायला लागल्यावर कळले .

वर्गातील स्कॉलर  मुले आपसूकच  शाईचे पेन वापरायला लागली  होती. रोजचा  'घरचा अभ्यास'  घरीच करणे , तास चालू असताना न शिकवलेल्या भागाची उत्तरे देणे  याबरोबरच शाईचे पेन खिशाला लावणे हा स्कॉलर मुलांच्या स्टेटसचा भाग होता. मला या शाईपेनाची निकड  वाटण्याचे कारण  मात्र वेगळे होते. माझे अक्षर तेव्हा काही फार चांगले नव्हते , त्यामुळे रोज पाच ओळी शुद्धलेखन काढून ते सुधारावे हा त्यांचा कटाक्ष.  मला मात्र माझ्या अक्षरापेक्षा वापरत असेलेले पेन जास्त दोषी वाटत असे.  (आपली चूक दुसऱ्यावर लादायची सवय जुनी  आहे ) . 'आमच्या आईसाहेब जर का सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो' या धर्तीवर 'माझे पेन सुद्धा खरचं  चांगले असते तर अक्षरही चांगले आले असते ' असे  मी बाणेदारपणे सांगितल्याचे आठवते. पण माझ्या या अत्यंत  प्रामाणिक आणि बाणेदार उत्तराचे कौतुक त्या दिवशी २० ओळी शुद्धलेखन काढायला सांगण्यात येउन मिळाले. सांगायचा मुद्धा हा की शाईच्या पेनाची गरज शुद्धलेखनातून आली आणि मी पहिले पेन , शाईची बाटली घेतली ( मी घेतलेली पहिली बाटली शाईची होती हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आले असेलचं, तसे आम्ही सज्जनच , असो विषयांतर नको म्हणून कंसात टाकले) त्या पेनात शाई हाताने भरणे ,  त्यात अर्धी पेनात , पाव हातावर  व पाव जमिनीवर असे सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पडले.  मग ड्रोपरचा ऊगम झाला आणि बरीचशी शाई पेनात जाऊ लागली .  प्रथम शाईचे पेन वापरताना त्रास होत असे.  लिहिण्याचा वेग कमी होतोय असे वाटे पण हळूहळू सवय झाली  , मग अक्षरही चांगले  वाटू लागले.  मराठीच्या पेपरला तर मी न चुकता शाईपेन वापरत असे. हीरोचे एक पेन मी सलग २ वर्ष वापरल्याचे आठवते. (बाकी  ते पेन वापरले म्हणून स्कॉलर लोकांमध्ये काही  गणती झाली नाही  ! )

आता मागे बघताना वाटतं ते  पाटी पेन्सिल , दुहेरी ओळींची वही , शिसपेन्सिल ,  एकेरी ओळी , मग बॉलपेन , शाईचे पेन  या मोठं  होयच्या खुणा  होत्या.  पहिली दुसरीमध्ये वेगवेगळे  काय शिकलो ते आठवत नाही  पण हे वेगळेपणं , या अदृश्य पायऱ्या लक्षात आहेत .  आज त्याची सहज आठवण आली . शाळेमधल्या  गोष्टी काही मी जपून ठेवल्या नाहीत .  पण काही आठवणी कायम जपेन अशी इच्छा आहे , म्हणून त्या लिहिण्याचा हा प्रपंच !


Comments

Kaps said…
Agadi kharay... Shai penachi maja kahi aurach hoti...

Ha blog shai penane lihun scan karun tak :)

Popular posts from this blog

Few questions after a win in Lost series...

Sometimes..

करायचं ते करून टाक