आमचे सर
सदर लेख 2021 मधील आहे..
प्रिय मिलिंद काकांस ,
काल दुपारी १ च्या सुमारास फोन वाजला , आणि कळलं टिकेकर सर गेले. मन सुन्न ,उद्विग्न झालं. ऐकलेली बातमी खोटी ठरावी असं मनोमन वाटून गेलं. पण दुर्दैवाने अशा बातम्या खऱ्या असतात. आणि पहिल्यांदा जाणीव झाली , आपले टिकेकर सर गेले. तुला मी पहिल्यांदा दुसरीत असताना भेटलो असें , तुझ्या आईकडे मी शिकवणीसाठी यायचो. सकाळी ८ वाजता असायची साधारण. तू बरेचदा झोपेतून उठत असायचास. आज पण मला बाईंची ती घर सांभाळत शिकवणी घ्यायची लगबग आठवते. तू त्यावेळी बी.एड च्या शेवटच्या वर्षाला असावास बहुतेक. ७-८ मुलांचा छोटासा वर्ग तो.. तिथे आम्ही खूप शिकलो - आणि त्यात पण तुझे आमच्याकडे असलेलं बारीक लक्ष आठवते. कोण विद्यार्थी किती पाण्यात आहे , कोण लक्ष देतंय किंवा टिवल्या -बावल्या करताय यावर विशेष टिकेकर style टिप्पणी यायची. आम्हाला मिलिंद काकाचे अप्रूप होते.. त्याच वेळी कबड्डी खेळताना तुझा समोरचा दात तुटला होता.. पण तुझ्यामध्ये अजिबात फरक पडला नव्हता .. त्याचे काय एवढे.. खेळताना होयचंच असं , असा साधा सरळ हिशोब. आज जाणवत की हा साधा सरळ हिशोब मांडणं फार अवघड असतं , पण ते तुला नेहेमीच सहज जमलं.
त्यानंतर तू ६ वीत असताना शाळेत शिक्षक म्हणून आलास, आणि लोकप्रिय शिक्षक झालास . आम्हाला शिकवायला खरं म्हणजे ९वी / १०वी मध्ये आलास , पण त्याआधीही ऑफ तासाला टिकेकर सरच हवे असायचे. तुझ्या तासाला फक्त शिकणे नव्हते , या शाळेबाहेर देखील एक मोठे आणि वेगळे जग आहे आणि त्यामध्ये आपल्या मुलांनी केवळ टिकाव ना धरता , पुढेही गेले पाहिजे. ही तळमळ होती. त्या जगाची ओळख आम्हाला विविध किस्से , गोष्टी यातून होत होती. आजही मला तो आदिवासी पाड्यात जाऊन "हुदीर " ( उंदीर) भाजी खाल्लेला किस्सा आठवतो. हुदीर खाऊन तुमच्या ग्रुपमधील बऱ्याच जणांना उलट्या झाल्या होत्या.. तू म्हणालास एकदा पोटात गेलं की हुदीर काय आणि दुसरं काय .. एकूण एकच !! असाच एकदा ऑफ तासाला आमच्याकडून मराठीच्या कविता म्हणून घेतल्यास.. त्यात आम्ही 'बीज अंकुरे अंकुरे' कविता म्हटली.. चाल सरधोपटच होती. पण तू लगेच आम्हाला अरे ही कविता म्हणजे क्लासिक आहे , गोट्या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून प्रसिद्ध आहे , हे सांगितलेस. आणि लगेच मूळ गोड चालीवर ती कविता बसवून आमची पाठ पण झाली. कवितेचा आनंद फक्त शब्दातून नाही तर सूर-तालामधून सुद्धा घेता येतो ही जाणीव दृढ झाली आणि टिकेकर सरांचा तास म्हणजे काव्य शास्त्र विनोदाचा तास हे मनात घट्ट झाले.
मी तुझयाकडे मराठी शिकलो , भूगोल शिकलो. दहावीला असताना अनेक वेळा मराठी / भूगोलाचे अधिक पेपर तुझ्याकडून तपासून घेतले. भूगोल हा पुस्तकापलीकडे जाऊन बघायची दृष्टी दिलीस. मराठी मध्ये निबंध हा तुझा आवडता. माझे अनेक निबंध वाचून त्यातील कमी अधिक गोष्टी सांगितल्यास , तो सुधारण्यासाठी मार्ग सांगितलेस. वाचनावर भर पाहिजे हे रुजवलेस. written communication शिकवणं म्हणजे दुसरं काय असता हो ?
निबंधावरून आठवले ,माझ्या भावाने 'मी पाहिलेला अविस्मरणीय सामना" म्हणून पूर्ण लगानची गोष्ट लिहिली होती.. पूर्ण पेपरवर लगान गोगटे म्हणून शेरा मारून ठेवला होतास. मिश्किलपणाने विद्यार्थ्याला कुठे चुकतोय हे सांगायची तुझयाकडे हातोटी होती..
पुढे १०वी नंतर भेटी कमी होता गेल्या.. पण तरीसुद्धा तू आमच्याबरोबर केरळला ८ दिवस आला होतास. आम्ही तुझे येणे ग्रांटेड घेतले होते पण आता मोठे झाल्यावर त्यासाठी तुला कशी कसरत करावी लागली असेल हे कळते. बाई ( तुझी आई) म्हणाल्या होत्या "गोगटे, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये" , पण १२वी झाली आणि ट्रिप काढायची म्हटल्याबरोबर आमच्यासमोर तूच आलास , मुलांना कुठे मोकळे सोडावे आणि कुठे शिस्तीत ठेवावे हे तुला पक्के माहीत होते. म्हणूनच तुझ्याबरोबरच्या सर्व ट्रिप अविस्मरणीय अशाच होत्या. हल्ली इतक्यात बोलणे कमी झाले होते , तरी मागच्या वर्षी जेव्हा तुला भेटलो तेव्हा तुझ्यामधला तो मिश्किल स्वभाव तसाच होता. हल्ली मुलांना इतके मार्क कसे ? असे विचारल्यावर तू लगेच म्हणालास , अरे तुमच्यावेळी मार्क मिळायचे , हल्ली ते "पडतात". बाई नेहेमी म्हणायच्या , मला नुसते "बोलूकाका" नकोत , "करुकाका" हवेत. पण खऱ्या अर्थाने तू बोलूकाका पण होतास , आणि करुकाका देखील होतास. हृदयविकाराने तू गेलास.. एकच वाटतं, सर तुम्हाला माहित पाहिजे होतं ....की , ये "दिल" मांगे मोर !!
-समीर गोगटे
Comments